आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय, पुणे
भारतातील विविध राज्यातील आदिवासी लोकसंख्येत महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या 85.77 लक्ष आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील वारली, भिल्ल, पावरा, कोकणा, ठाकर, गोंड, माडिया, कोरकू आणि मावची या जमातींनी स्वत:ची हस्तकला विकसित केलेली आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे अधिनस्त आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना सन 1965 मध्ये करण्यात आली. तेंव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्रातील आदिवासी जीवन व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे प्रयत्न आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयात करण्यात येत आहे. या संग्रहालयात एकूण 1359 आदिवासी कलावस्तू प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत.
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय प्रमुख पाच विभागात प्रदर्शित केले आहे.
1) संग्रहालय दृष्टीक्षेप (कै.डॉ. गोविंद गारे कला दालन) :-
पर्यटकांना संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रथम हे सभागृह बघता येते. या विभागात महाराष्ट्रातील प्रमुख जमातींपैकी 18 आदिवासी जमातींची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. या जमातींना कोकण, मराठवाडा, गोंडवना व सातपुडा अशा 4 भौगोलिक क्षेत्रामध्ये वर्गीकृत करण्यात आलेले आहे. एका दृष्टीक्षेपात सदर जमातींच्या ठळक वैशिष्टयपूर्ण कलावस्तू छायाचित्रांसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. या विभागात पर्यटकांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे द्वारा निर्मित आदिवासी जीवन, कला, संस्कृती व आदिवासीसाठींच्या योजना यावर आधारीत विविध माहितीपट दाखविण्यात येतात.
2) आदिवासी साहित्य संस्कृती :-
या विभागात आदिवासी पारंपारिक संगीतातील विविध वाद्ये, आदिवासी जीवनातील दैनंदिन गृहउपयोगी उपकरणे, आदिवासींची शिकारीची साधने/हत्यारे, शेतीसाठी वापरात येणारी अवजारे, देव-देवता, जादूटोण्यामध्ये वापर करण्यात येणाऱ्या वस्तू, लग्नप्रसंगी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बाशिंग, चुंबळ, लग्न खांब, तसेच महाराष्ट्रातील आदिवासी समकालिन कलानमुने प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
3) आदिवासी कलादालन, बोहाडयाचे मुखवटे व बांबू कामाच्या वस्तू दालन :-
सदर दालनात महाराष्ट्रातील प्रसिध्द वारली चित्रकलेचे उत्तमोत्तम नमुने प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. पद्मश्री पुरस्कार प्राप्त वारली चित्रकार कै. जिव्या सोम्या मशे यांनी साकारलेली उत्तम अभिजात वारली चित्रे या दालनात बघावयास मिळतात. वारली व कोकणा जमातीत बोहाडयाचे मुखवटे प्रचलित आहेत. सदर मुखवटयांचे लाकडी व कागदी लगदयांचे अनेक नमुने या दालनात प्रदर्शित केलेले आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींत दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या वस्तू उदा. टोप्या, टोपल्या, सुपल्या, मासेमारीची साधने, रेखी, इ. पाहावयास मिळतात.
4) आदिवासी दागदागिने व देवदेवता :-
माडिया, भिल्ल, पावरा, कोरकू, वारली, कोकणा, इत्यादी आदिवासी जमातींच्या हस्तकलेचे नमुने असलेले सुबक सुंदर दाग-दागिने या दालनात प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. या सोबतच माडिया गोंड जमातीत वापरण्यात येणारी सुबक कोरीवकाम असलेल्या लाकडी अथवा फळांच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या तंबाखुच्या विविध आकाराच्या डब्या तसेच माडिया गोंडांमध्ये तरुण-तरुणी एकमेकांना प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट देत असलेल्या लाकडी फणीचे वैशिष्टयेपूर्ण नमूने आदिवासी कलागुणाचे उत्तम उदाहरण दर्शवतात. याच दालनात आदिवासी देव-देवतांचे टाक (प्रतिमा), दागिन्यांवर करण्यात येणाऱ्या कलाकुसरीचे तांब्याच्या प्रतीमा, तसेच देवदेवतांच्या प्रतीकृती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. आदिवासी जमातींमध्ये लॉस्ट वॅक्स टेक्निकच्या सहाय्याने मूर्तीकाम करण्यात येते. या मूर्तीकामाचे नमूनेही इथे प्रदर्शित केलेले आहेत.
5) मोकळया आवारातील आदिवासी झोपडयांच्या प्रतिकृती :-
आदिवासी संग्रहालयातील पर्यटकांना विशेष आवडणारा विभाग म्हणजे हे मोकळे आवार. आवारात प्रदर्शित केलेला झोपडयांचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वारली, माडिया, कोलाम व कोरकू जमातीच्या झोपडयांच्या प्रतिकृती व त्यासोबत मासेमारी करणारा आदिवासी युवक बघताना पर्यटक विशेष रमतात. या विविध आदिवासी झोपडयांसोबतच आदिवासी महिला व पुरुषांचे पुतळे व निसर्गातील पक्षी व प्राणी यांच्याही प्रतिकृती या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत.
6) आदिवासी हस्तकलांची झलक :-
या संग्रहालयात आदिवासी हस्तकलाकारांनी तयार केलेल्या त्यांच्या पारंपारिक हस्तकलांच्या वेगवेगळया वैशिष्टयपूर्ण अशा कलाकृती पर्यटकांना पहावयास मिळतात त्याचे वर्गिकरण खालीलप्रमाणे :-
-
लाकडापासून व बांबूपासून तयार केलेल्या कलावस्तू :-
आदिवासी जीवनात लग्नविधीला अतिशय महत्त्व असते. लग्नविधीसाठी गोंड जमातीत “मुंडा” (लाकडी कोरीव खांब) तयार करावा लागतो. मुंडा हा आदिवासी हस्तकलेचा अप्रतिम नमुना आहे. ‘भिल्लाची लगन टोपली’ ही देखील बांबू कामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
-
धातूंपासून तयार केलेल्या कलावस्तू :
डोकरा आर्ट किंवा लॉस्ट वॅक्स टेक्निक ही धातूपासून वस्तू बनविण्याची अतिशय प्राचिन कला आदिवासींना अवगत आहे. महाराष्ट्रातील माडिया या आदिम जमातीने ही पारंपारिक कला जतन केलेली आहे. त्यांच्या सांस्कृतिक जीवनाशी या कलेचा निकटचा संबंध आहे. या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या देवी देवता उदा. माताघोडा, ठाकूरदेव, तेलरीन माता, शल्पी, तसेच हरीण, म्हैस, उंट, मासा, घोडा, बैलगाडी इ. त्याची उत्तम उदाहरणे आहेत. आदिवासी देवदेवतांच्या विविध प्रतिमा व मूर्ती उदा. डोंगरदेव, सातदेव, पंचशिऱ्या, हिरवादेव, सुपली, चव्हाटा, शिवऱ्या वगैरे जतन करुन ठेवल्या आहेत. सजावटीचे आणि धार्मिक मूल्य असलेले धातूचे शिल्प देखील प्रदर्शित केले आहेत.
-
मुखवटे :-
ठाणे, पालघर व नाशिक जिल्हयातील आदिवासी जमातींमधील प्रसिध्द असे बोहाडा मुखवटे, तसेच सूर्यदेव, चंद्रदेव, भवानी, अर्धनारीनटेश्वर, विष्णू, रावण यांचे कागदी लगदयांपासून व लाकडापासून तयार केलेले हस्तकलेचे सुंदर मुखवटे पर्यटकांना पाहण्यासाठी प्रदर्शीत केलेले आहेत.
ड) संगीत वाद्ये :-
आदिवासी पारंपारिक वाद्यप्रकारांचे वर्गिकरण मुख्यत: पवन वाद्ये, तालवाद्ये, तंतूवाद्ये व इतर लयवाद्ये या चार श्रेणींमध्ये केलेले दिसून येते. यामध्ये वारली जमातीमधील ढाक भगताद्वारे वाजविले जाणारे ‘ढाक’ वाद्य, जनावरांच्या चामडयापासून तयार केलेले ‘तिबुली’ वाद्य, माडिया गोंड जमातीमध्ये प्रसिध्द असलेले मातीपासून तयार केलेले ‘मांदळ’ वाद्य, कोरकू आदिवासींमध्ये उत्सवात वाजविले जाणारे ‘ढिमकी’ वाद्य, माडिया जमातीमध्ये झाडाचा बुंधा पोकळ करुन त्यापासून तयार करण्यात येणारे व उत्सवात वाजविले जाणारे ‘ढोल’ वाद्य, थाळी बरोबर संगतीसाठी इंदल पूजेला वाजविले जाणारे ‘झांबलो’आणि ‘चिपळया’ ही वाद्ये आणि लुप्त होत चाललेले ‘हिरोबाई किंगरी’ हे तंतूवाद्य, वारली पुजेत वापरले जाणारे ‘घांगळी’ हे तंतूवाद्य पर्यटकांना पहावयास मिळतात.
7) सांस्कृतिक विभाग :-
आदिवासी संस्कृतीची ओळख नागरी भागातील लोकांना होणे सहज शक्य नसते. महाराष्ट्रातील आदिवासी कला, संस्कृती, जीवन तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि आदिवासी समाजाच्या विविध ज्वलंत विषयांवर या संस्थेने एकूण 91 लघुपटांची निर्मिती केली आहे. या लघुपटांमुळे आदिवासी संस्कृतीची सहज कल्पना येते आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होते. आदिवासी संस्कृती कशी आहे याचा अनुभव येतो. असे साहित्य कोठेही उपलब्ध नसल्याने लघुपट दर्शन पर्यटकांना एक पर्वणीच असते. संस्थेने तयार केलेले लघुपट एल.सी.डी. प्रोजेक्टरद्वारे संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटक, विद्यार्थी यांना दाखविण्याची व्यवस्था संस्थेत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी आदिवासी कलामहोत्सवात हे लघुपट प्रेक्षकांना दाखविण्यात येतात. संग्रहालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते ज्यात हस्तकला प्रदर्शन, वारली चित्रकला स्पर्धा आणि आदिवासी नृत्य स्पर्धा समाविष्ट आहेत.
8) संग्रहालयाचा पत्ता:
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय,
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,
28, क्वीन्स गार्डन, पुणे 411 001.
आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय हे 28, क्वीन्स गार्डन, पुणे 411 001 येथे पुणे छावणी क्षेत्रात जुन्या सर्किट हाउसजवळ असलेल्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमध्ये तळमजल्यावर आहे. जुन्या सर्किट हाऊस पासून समांतर रस्त्याने 250 मीटर दूर, कोरेगाव पार्क रोडच्या दिशेने, पुलावर जाण्यापूर्वी उजव्याबाजुला. पुणे शहर हे रस्ते महामार्ग, रेल्वे आणि विमान वाहतूक मार्गाने जोडलेले आहे. पुणे रेल्वे स्टेशन आणि एस.टी. बसस्थानका पासून संग्रहालय केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. पुणे विमानतळ फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे.
- विमानतळ: जवळचे विमानतळ लोहगाव विमानतळ, पुणे आहे. संग्रहालय पासून 5 किमी दूर.
- रेल्वे स्थानक: पुणे रेल्वे स्टेशन संग्रहालयापासून 1 किमी दूर आहे.
- एस.टी.बस स्थानक: पुणे एस.टी. बस स्थानक संग्रहालयापासून 1 किमी दूर आहे.
- जवळची खुण: जुने सर्किट हाऊस, 28 क्वीन्स गार्डन, पुणे - 411 001
संग्रहालयाची वेळ:
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 (सरकारी सुट्ट्या वगळता, सर्व दिवस खुले)
संपर्क अधिकारी :
संग्रहालय अभिरक्षी :- संतोष ननवरे
- फोनः (020) 26330854
- फॅक्स: (020) 26330854
- ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it./ This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
9) संग्रहालय प्रवेश शुल्क :-
- रु. 5 / - प्रति बालक ( 6 ते 12 वयोगटाकरीता)
- रु. 10/- प्रति प्रौढ व्यक्ती
- रु. 50/ - परदेशी विद्यार्थी
- रु. 100/ - परदेशी बालक
- रु. 200/ - परदेशी प्रौढ व्यक्ती